नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीमध्ये मासिक सिरो- सर्वेक्षणाची तिसरी फेरी आज सुरु होत आहे. या टप्प्यात सुमारे १७ हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात येईल. यापूर्वीचं सर्वेक्षण १ ते ७ ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं, त्यामध्ये २९ टक्के लोकांमध्ये कोविड-१९ संक्रमणाच्या विरुद्ध प्रतिजैविकं आढळून आली. त्यावेळी १५ हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आल्याचं दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं.

यामध्ये पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये प्रतिजैविकं सापडण्याचं प्रमाण अधिक आहे. तसंच अठरा वर्षांहून कमी वयोगटातही हे प्रमाण जास्त असल्याचंही आढळून आलं आहे.  दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढच होताना दिसत आहे. दिल्लीमध्ये आजवर पावणे दोन लाख लोक कोरोनाबाधित झाले असून मृतांची संख्या ४ हजार ४४४ वर गेली आहे.