माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लिखित ‘विधानगाथा‘ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील लिखित विधानगाथा हे पुस्तक म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचे ‘हॅण्डबुक’ आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात श्री.पाटील लिखित ‘विधानगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,परिवहनमंत्री दिवाकर रावते, संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते.
श्री.फडणवीस म्हणाले, श्री.पाटील यांनी सलग 10 वर्षे संसदीय कार्यमंत्री म्हणून काम केले. त्यांनी विधानगाथा या पुस्तकातून प्रत्यक्ष आपले अनुभव मांडले आहेत. विधानमंडळाची रचना, नियम, कार्यपद्धती याबाबतची सर्वांगीण माहिती या पुस्तकात उपलब्ध आहे. ज्यांना विधानमंडळाच्या कामामध्ये रस आहे,त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. संसदीय कार्यमंत्री म्हणून श्री.पाटील यांची कुठल्याही प्रसंगातून मार्ग काढण्याची वेगळी हातोटी होती. सर्व सदस्यांना सोबत घेऊन श्री.पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध विधेयके मंजूर करुन घेतली. याबाबतही श्री.फडणवीस यांनी श्री.पाटील यांचे कौतुक करुन यापुढेही विविध विषयांवर चांगली पुस्तके लिहून समाजप्रबोधनाचे कार्य करावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.
नव्याने विधिमंडळात सदस्य म्हणून येणाऱ्यांसाठी विधानगाथा हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे सांगत श्री.पवार यांनी श्री.पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
सलग 10 वर्षे संसदीय कार्यमंत्री म्हणून कार्य केल्यानंतर विधानगाथा या पुस्तकाच्या माध्यमातून एक वेगळा विचार समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे मनोगत श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी माजी मुख्यमंत्री श्री. शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.