पिंपरी: मध्यवर्ती भांडार विभागाकडून रूग्णालयांसाठी ” एक्स रे डिजीटल पोर्टेबल 100 MA मशिन्स” खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यात पिंपरी येथील नविन जिजामाता रूग्णालयाला देण्यात आलेली” एक्स रे डिजीटल पोर्टेबल 100 MA मशिन्स” ही दोनच दिवसात बंद पडल्यामुळे सदर मशिनच्या गुणवत्ते बाबत संशय निर्माण झाला असून, त्यामुळे सदर रूग्णालयासहित अन्य रूग्णालयांना देण्यात आलेल्या एक्स रे मशिन खरेदीची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा. श्रावण हर्डीकर यांना ऑनलाईन निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात खैरनार यांनी म्हटले आहे, कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात न्युमोनियाची तपासणी ही एक्स रे मशिनच्या माध्यमातून होते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा उपचार आणि उपाययोजनांच्या काळात एक्स रे मशिन्स ह्या अत्यावश्यक आहेत. याच पार्श्वभुमीवर महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाकडून रूग्णालयांसाठी एक्स रे मशिन्सची खरेदी करण्यात आली होती. यात नविन जिजामाता रूग्णालयाला दिलेली एक्स रे डिजीटल पोर्टेबल 100 MA मशिन वारंवार बंद पडत आहे. याबाबत रूग्णालयाने प्रशासनाला मशिन नादुरुस्त झाल्यामुळे येत असणाऱ्या अडचणींबाबतचे पत्र दिले आहे. त्यामुळे रुग्णालयात पोहोचल्यानंतर एक्स रे मशिन अभावी सामान्य रुग्णांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोरोना संसर्गाच्या काळात इतर आजारांमुळे बाधीत रुग्णांना यामुळे जीवावर बेतू शकते. या मशिनची खरेदी ही बाजारभावापेक्षा वाढीव दराने करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून पुरविण्यात आलेल्या मशिन्स या योग्य कंपनीचे असल्याचे भासविण्यासाठी मशिनवर बनावट स्टिकर्सही चिटकविण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. यातून शहरातील सर्वसामान्य करदात्यांच्या पैश्यांची कशा प्रकारे उधळपट्टी चालू आहे हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मध्यवर्ती भांडार विभागाकडून एक्स रे मशिन खरेदी कामी राबविण्यात आलेली निवीदा प्रक्रीया तसेच ठेकेदाराने पुरविलेल्या मशिन्स ह्या स्पेसिफिकेशन नुसार त्याच आहेत का? याची पुर्नतपासणी होणे गरजेचे आहे.
संपुर्ण देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना, महापालिकेने कोट्यावधी रुपये मोजूनही निकृष्ट दर्जाची उपकरणे ठेकेदाराने दिली आहेत. त्यामुळे या खरेदीची चौकशी करून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच कामांचे बिल अदा करू नये, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.