मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची आज एकमतानं निवड करण्यात आली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहात याबाबतची घोषणा केली.
उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे आणि भाजपकडून भाई गिरकर रिंगणात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या अधिवेशनात अनेक सदस्यांना उपस्थित राहता आलं नाही. त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी विरोधकांनी केली होती.
तसंच या मागणीसाठी भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या गुरूवारी सुनावणी असल्यानं आज ही निवडणूक घेऊ नये अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती.
मात्र उच्च न्यायालयानं आपल्याला याबद्दल काही सूचना दिली नसल्याचं सांगून सभापती निंबाळकर यांनी दरेकर यांची मागणी फेटाळून लावत निवडणुकीचा कार्यक्रम पुकारला. यावर विरोधकांनी सभात्याग केला. त्यामुळे भाई गिरकर यांच्या नावाचा प्रस्ताव भाजप सदस्यांना मांडता आला नाही आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा प्रस्ताव एकमतानं मंजूर झाला.
गोऱ्हे यांची उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री आणि सभागृह नेते अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं.