नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिक टीव्हीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, सातत्यानं राज्याचे प्रमुख आणि सरकार यांच्याविरोधात एकांगी विधानं करून शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवल्याबद्दल हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेतला आणि नियमानुसार कारवाई करण्याची सूचना केली. यामुळे मंत्री आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन कामकाज आज तीनदा तहकूब झालं.

अभिनेत्री कंगना राणावत आणि रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधान परिषदेत हक्कभंग प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली. राणावत हिच्या विरोधात काँग्रेसचे भाई जगताप यांनी तर गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सूचना स्वीकारल्या असून यावर नंतर निर्णय देणार असल्याचं जाहीर केलं. अनेकांच्या बलिदानातून मिळालेल्या मुंबईचा अपमान करून कंगनानं मुंबईशी गद्दारी केली आहे अशी टीका जगताप यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडताना केली.

वास्तूविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी नाईक यांच्या पत्नीनं आणि मुलीनं केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं अर्णब गोस्वामी यांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी ही मागणी केली होती. अभिनेत्री कंगना राणावत हिनं महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचा अपमान केला आहे. याचा सर्व पक्षांनी निषेध केला पाहिजे, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.