पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या कोरोनाचा कहर चालू आहे. कोरोनामुळे दररोज वीस पंचवीस लोक मृत्युमुखी पडत आहेत व हजाराच्या संख्येत नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी महानगरपालिका आहे व तीचा तसा नावलौकिक ही आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनासह पिंपरी चिंचवड मनपाचा स्वनिधी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना, इतक्या मोठ्या संख्येने दररोज रुग्ण पोझेटिव्ह सापडणे व रोज मृत्युमुखी पडणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. याला सर्वस्वी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. समन्वयाचा अभाव व अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, हाताखालील कर्मचाऱ्यांना कुठलीही किंमत न देणे. शहरातील सन्माननीय नागरिकांच्या व एनजीओच्या सूचनांचा आदर न करता व त्यावर अंमलबजावणी अथवा योग्य निर्णय न घेता, केराची टोपली दाखवणे असा एक कलमी कार्यक्रम डॉक्टर पवन साळवे सध्या राबवत आहेत.
डॉक्टर साळवे यांच्याकडे कोणतीही निर्णय क्षमता नाही. कारण आम्ही केलेल्या अनेक माहिती अधिकार अर्जावर डॉ. साळवे यांनी केराची टोपली दाखवली आहे. जर का आमच्यासारख्या एनजीओंना डॉ. साळवे अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्यांच्या बाबतीत विचार न केलेला बरा!
आम्ही आपणांस विनंती करतो, शहरातील कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आणून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी, आपण अशा नियोजनशून्य कारभार करणारे, कुठली निर्णय क्षमता नसणारे डॉक्टर साळवे, यांना तात्काळ अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी पदावरून हटवण्यात यावे व त्या जागी अतिशय सक्षम व योग्य निर्णय क्षमता असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी. अशी मागणी जागृत नागरिक महासंघ अध्यक्ष नितीन श. यादव, सचिव उमेश सणस, उपाध्यक्ष राजेश्वर विश्वकर्मा, रोहिणी नि. यादव, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे व इतर सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.