नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्रातील तीन प्रमुख प्रकल्प 13 सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात पॅराद्वीप-हल्दीया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका विभाग आणि दोन एलपीजी बॉटलिंग प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयांतर्गत असलेल्या इंडियन ऑईल आणि एचपीसीएल या दोन पीएसयुकडून या प्रकल्पांचे संचलन केले जात आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांची याप्रसंगी उपस्थित असणार आहे.

पाईपलाईन प्रकल्पाचा दुर्गापूर-बान्का विभाग

193 किमी लांबीच्या दुर्गापूर-बांका पाईपलाईन विभागाची इंडियन ऑईलने उभारणी केली आहे. हा पॅराद्वीप-हल्दीया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तारीत प्रकल्पाचा भाग आहे, ज्याचा पायाभरणी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी 2019 रोजी पार पडला होता. दुर्गापूर-बांका विभाग हा पॅराद्वीप-हल्दीया-दुर्गापूर येथील सध्याच्या 679 किलोमीटर लांबीच्या एलपीजी बॉटलिंग प्रकल्प पाईपलाईनचा विस्तारीत घटक आहे. 14” व्यासाची पाईपलाईन पश्चिम बंगाल (60 किमी), झारखंड (98 km) आणि बिहार (35 किमी) अशी तीन राज्यांमधून जाते. सध्या एलपीजी भरणा पॅराद्वीप रिफायनरी, हल्दीया रिफायनरी आणि आयपीपीएल हल्दीया येथून केला जातो. प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर, एलपीजी भरणा सुविधा पॅराद्वीप इम्पोर्ट टर्मिनल आणि बरौनी रिफायनरीतून केली जाईल.

दुर्गापूर-बांका विभागात पाईपलाईनसाठी अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मिती अडथळे पार करण्यात आले. 13 नद्यांवर 154 क्रॉसिंग उभारण्यात आले (यापैकी एक अजय नदीवरील 1077 मीटर लांबीचा आहे), 5 राष्ट्रीय महामार्ग, 3 रेल्वे क्रॉसिंग आहेत. नदीपात्रातून आडव्या दिशेने ड्रिलींग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाण्याचा प्रवाहाला अडथळा न करता पाईपलाईन नेण्यात आली आहे.

एलपीजी बॉटलिंग प्रकल्प, बांका, बिहार

इंडियन ऑईलचा बांका येथील एलपीजी बॉटलिंग प्रकल्प बिहारची एलपीजीची वाढती गरज पाहता, बिहारला ‘आत्मनिर्भरता’ प्रदान करेल. या बॉटलिंग प्रकल्पाची निर्मिती 131.75 कोटी रुपये खर्च करुन करण्यात आली आहे आणि भागलपूर, बांका, जमूई, अरारिया, किसनगंज आणि कथिहार या बिहारमधील जिल्ह्यांना आणि झारखंडमधील गोड्डा, देवघर, दुमका, साहिबगंज आणि पाकूर जिल्ह्यांना लाभ होईल. प्रकल्पाची एलपीजी साठवणूक क्षमता 1800 मेट्रीक टन आणि बॉटलिंग क्षमता 40,000 सिलेंडर्स प्रतिदिन आहे, या प्रकल्पामुळे बिहार राज्यात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होईल.

चंपारण (हरसिद्धी) येथील एलपीजी प्रकल्प, बिहार

एचपीसीएलच्या 120 टीएमटीपीए एलपीजी बॉटलिंग प्रकल्पाची उभारणी पूर्व चंपारण जिल्ह्यातील हरसिद्धी येथे 136.4 कोटी रुपये खर्चाने केली आहे. 29 एकर जागेवर प्रकल्पाचा विस्तार आहे, या प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 एप्रिल 2018 रोजी करण्यात आला होता. या बॉटलिंग प्रकल्पामुळे पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, मुझफ्फरपूर, सिवान, गोपालगंज आणि सीतामढी जिल्ह्यांची गरज भागवली जाईल.

या कार्यक्रमाचे दूरदर्शन न्यूज वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.