पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्य माणसासाठी, कामगारांसाठी आयुष्यभर कार्य केले आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात शासनाच्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच मातंग समाजाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. पाटील बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गो-हे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आ. भीमराव तापकीर, आ. मेधाताई कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, सुनिल कांबळे, सुनिल महाजन, राजेश पांडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, साहित्यरत्न अण्णाभाऊंनी आपले विचार व साहित्यातून कायम वंचितांचा आवाज मांडला आहे. मातंग समाजाच्या सर्वसामान्य माणसासाठी कामगारांसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. शासनाने मातंग समाजासाठी 1 लाख घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासाठीही निधीची भरीव तरतूद केली असून त्याअंतर्गत अनेक सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर राहील, मातंग समाज आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या पुढे येण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसभापती नीलमताई गो-हे म्हणाल्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचित घटकांसाठी मोठे कार्य केले आहे. अण्णाभाऊंचे विचार रुजविण्याची गरज आहे. जन्मशताब्दी वर्षात आपण अण्णाभाऊंचे विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाहीर विणाताई अवघडे, डॉ. प्रभाकर मांडे, प्रा. रतनलाल सोनग्रा यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.