नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुचर्चित कृषी विधेयकं आज राज्यसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आली. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक; शेतकरी सशक्तीकरण आणि किंमत हमी विधेयक आणि कृषी सेवा करार विषयक विधेयक ही दोन विधेयकं आज राज्यसभेत चर्चेसाठी मांडण्यात आली होती.

ही ऐतिहासिक विधेयकं असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी; हे विधेयक सादर करताना केलं.

तसंच शेतक-यांना हमीभावाची सुरक्षा मिळत राहणार असल्याचं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केलं. या विधेयकामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशात कुठेही कुठल्याही परवान्याविना विकता येईल असं तोमर म्हणाले.

तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी विधेयकाच्या विरोधातला प्रस्ताव सभागृहात सादर केला. हे विधेयक बड्या कंपन्यांच्या फायद्याचं असून यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण होणार नाही, असं मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार के.के. रागेश या विधेयकावरील चर्चे दरम्यान म्हणाले.

या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ केला. अखेर आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं.