नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी हेतुपुरस्सर कर्ज बुडवणाऱ्यांकडून गेल्या तीन आर्थिक वर्षात १० हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

देशातल्या सार्वजनिक तसंच खासगी बँकांचं १२ हजार ३३८ कोटी रुपयांचं कर्ज २१९ कर्ज दारांकडून जाणीवपूर्वक थकवण्यात आलं होतं. यासंदर्भात सीबीआयकडे ५१२ दावे दाखल झाले होते. त्यापैकी २६९ प्रकरणाची न्यायालयीनं प्रकीया २०१८ पासून यावर्षीच्या ऑगस्ट दरम्यान सुरु झाली आहे, असंही ठाकूर यांनी सांगितलं.

गेल्या तीन वर्षात सरकारनं एकंदर तीन लाख ८२ हजार ५८१ बनावट कंपन्या बरखास्त केल्या आहेत, अशी माहितीही ठाकूर यांनी दुसऱ्या एका लेखी उत्तरात दिली.

ज्या कंपन्या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून ज्यांचे कुठलेही व्यवहार सुरू नाहीत किंवा त्यांच्या नावे कुठलीही ठोस अशी मालमत्ता नाही, अशा बनावट कंपन्या शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारनं मोहीम हाती घेतली आहे. असं ठाकूर यांनी या उत्तरात म्हटलं आहे.