नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने (एनपीपीए) राष्ट्रीय अत्यावश्यक औषधांची यादी (एनएलईएम), 2015 अंतर्गत 871 निर्धारित औषधांच्या कमाल  किंमती निश्चित केल्या आहेत.

कमाल मर्यादा किंमतीच्या निर्धारणात औषध मूल्य नियंत्रण ऑर्डर (डीपीसीओ)  2013 अंतर्गत कार्डियाक स्टेंटची कमाल किंमत समाविष्ट आहे, ज्यामुळे कोरोनरी स्टेंटची किंमत बेअर मेटल स्टेंटसाठी 85% आणि ड्रग इल्युटिंग स्टेंटसाठी  74% पर्यंत कमी झाली.

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. गौडा यांनी सांगितले की, डीपीसीओ  2013 अंतर्गत असाधारण अधिकारांचा वापर करून कार्डियक स्टेंट्स, गुडघा प्रत्यारोपण , 106 मधुमेह प्रतिबंधक आणि कार्डिओव्हॅस्क्युलर  औषधे आणि 42 नॉन-शेड्यूल कॅन्सरविरोधी औषधे देखील जनहितार्थ मूल्य सुसुत्रीकरणाअंतर्गत आणली आहेत.

ते म्हणाले, एनपीपीएद्वारा कमाल मर्यादेचे दर निश्चित करणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. जेव्हा आवश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीमध्ये नवीन औषधांचा  समावेश केला जातो तेव्हा त्यांची किंमत एनपीपीएद्वारे निश्चित केली जाते.