नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदनगर येथील आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलच्या (एसीसीअँडएस) केके रेंजेस येथे लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची(एटीजीएम) यशस्वी चाचणी 22 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात आली. या चाचण्यांमध्ये 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्यावर यशस्वीरित्या नेम धरून मारा करण्यात आला. लेझर गाइडेड एटीजीमचा वापर त्यातील लेझरच्या सहाय्याने लक्ष्य सुनिश्चित करणे आणि अचूक मारा करण्यासाठी होतो.
हे क्षेपणास्त्र रणगाड्यांना नष्ट करण्यासाठी वापरले जाते. ते बहुपर्यायी क्षमतांसह विकसित केले गेले आहे आणि सध्या एमबीटी अर्जुन या रणगाड्याच्या तोफे मधून तांत्रिक मूल्यांकन चाचण्या सुरू आहेत.
हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरॅटरी (एचईएमआरएल) पुणे, आणि इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (आयआरडीई) डेहराडून यांच्या सहकार्याने आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅबलिशमेंट (एआरडीई) पुणे यांनी हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
केके रेंजेस येथे एमबीटी अर्जूनच्या माध्यमातून झालेल्या लेझर गाइडेड अँटी टँक गाइडेड मिसाईलच्या (क्षेपणास्त्राच्या) यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.
या यशस्वी चाचणी परीक्षणाबद्दल डीडीआर अँड डी चे सचिव आणि डीआरडीओ चे अध्यक्ष यांनीही डीआरडीओच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.