पुणे : गेले दोन – तीन दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील पश्चिम भागात अतिवृष्टी होत असून त्यामुळे पुणे जिल्हयातून वाहणा-या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नदया दुथडी भरुन वाहत आहेत. त्याच प्रमाणे सातारा जिल्हयातील कृष्णा कोयना, तारळी, उमोडी या नदयांनाही पूर आलेला आहे. कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा, वारणा, या नदयासुध्दा दुथडी भरुन वाहत आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून सर्व विभाग सतर्क ठेवण्यात आले आहेत.
पुणे महसूल विभागात आज अखेरीस 120 टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागातील जिल्हा निहाय झालेला पाऊस खालील प्रमाणे पुणे जिल्हा 153 टक्के,
सोलापूर 78 टक्के, सातारा 150 टक्के, सांगली 188 टक्के, आणि कोल्हापूर 95 टक्के.
पुणे – पुणे शहरामध्ये मुळा, मुळा व पवना या नदया पुणे शहरातून जात असल्यामुळे पुणे शहरात पूर परिस्थिती असून पुणे शहरातील अंदाजे 450 कुटुंबियातील 1800 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील जुनी सांगवी, दापोडी, रहाटणी, वाकड रावेत या परिसरातील काही सोसायट्या बाधीत झालेल्या आहेत. पुणे जिल्हयातील खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, निरा-देवघर, चासकमान, मुळशी या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदयांच्या काठावरील लोकांना सतर्कतेचा
इशारा देण्यात आला असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
सातारा -सातारा जिल्हयामध्ये 16 कुटुंबांतील 56 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेले आहे. सातारा जिल्हयामधील कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला असून या दोन्ही नदीच्या काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोयना धरणातून 60 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग चालू आहे. सातारा जिल्हयातील सातारा-लोणंद, जुना सातारा-पुणे, तारगाव-नांदगाव रोड, पाटण-मुळगाव, कराड-तांबवे आदी रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सांगली –कृष्णा व कोयना नदीला आलेल्या पुरामुळे सांगली व मीरज शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. सांगली महापालिका हददीत 85 कुटुंबातील 425 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
कोल्हापूर — कोल्हापूर जिल्ह्यातील 357 कुटुंबातील 1728 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून कोल्हापूर जिल्हायातील सर्वच नद्या दुतर्फा वाहत असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी दोन वेळा ओलांडली आहे.कोल्हापूर जिल्हयासाठी एनडीआरएफच्या एका टिमची मागणी करण्याचे आल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. सध्या कोल्हापूर-मिरज हा रेल्वे मार्ग बंद असलयाचे त्यांनी सांगितले.
सोलापूर -सोलापूर जिल्हयामध्ये पर्जन्यमान कमी आहे. पुणे जिल्हयातील जवळ जवळ सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे उजनी धरणाचा पाणी साठा 50 टक्क्यांपर्यंत पर्यंत गेला आहे. सोलापूर जिल्हयातील इंद्रायणीनदीच्या किना-यावरील राहणा-या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.