मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली. मागील चार वर्षांत  या योजनेचा 35 हजार 336 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली.

डॉ.खाडे म्हणाले, शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी ठरविण्यात आलेली रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येते. इयत्ता 11 वी, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे व नागपूरसारख्या शहरात वार्षिक खर्चासाठी 48 हजार ते 60 हजार रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेमध्ये आतापर्यंत 35 हजार 336 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून 117.42 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.

परिपोषण अनुदानात वाढ

सामाजिक न्याय विभागासह महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग व विजाभज, ओबीसी व विमाप्र विभागामार्फत संचालित अनुदानित वसतिगृह/निवासी शाळा/ आश्रमशाळा तसेच दिव्यांग मुला-मुलींकरिता स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या कार्यशाळा/निवासी शाळा तसेच मतीमंदांच्या कार्यशाळा मधील विद्यार्थ्यांना परिपोषण अनुदान देण्यात येते. सध्याची महागाई विचारात घेता अनुदानित संस्थांमधील विद्यार्थी/प्रवेशितांच्या परिपोषण अनुदानात वाढ करण्यात आली आहे.  या विद्यार्थ्यांना रु. 900/- ऐवजी रु. 1500/- अनुदान देण्यात येईल. मतिमंद व दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या अनुदानात रु. 990/-ऐवजी रु. 1650/- अशी वाढ करण्यात आली आहे.