नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या बाबरी मशीद प्रकरणी न्यायालयानं सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. लखनौमधल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निर्णय दिला. अयोध्येत ६ डिसेंबर १९९२ रोजी झालेली ही घटना पूर्वनियोजित नव्हती, असं न्यायालयानं या निर्णयात म्हटलं आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, उत्तर प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह, साध्वी ऋतंभरा, विनय कटियार आणि अयोध्येतल्या राममंदिराचे महंत नृत्यगोपालदास यांच्यासह एकूण ३२ आरोपी निर्दोष असल्याचं न्यायालयानं सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणी ३१ ऑगस्टपर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले होते, ही मुदत त्यानंतर महिनाभरासाठी वाढवली होती. खटल्याची सुनावणी जलद पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयानं दररोज सुनावणी घेत, आज या मुदतीच्या अखेरच्या दिवशी हा निर्णय दिला.