मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला अधिकार सांगत आज बैठकांच आयोजन केलं आहे. दोन्ही गटांकडे नेमके किती आमदार आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी तसंच नेतृत्वाची ताकद दाखवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. राज्य विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५३ आमदार आहेत. पक्षांतर बंदीची कारवाई टाळण्यासाठी अजित पवार यांना किमान ३६ आमदारांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. अजित पवार यांनी आपल्याला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर अजित पवार यांच्यासह सरकारमध्ये सामील झालेल्या केवळ ९ आमदारांचाच त्यांना पाठिंबा असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या गटाची बैठक बांद्रा इथं सुरू आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेत्यांसह आमदार, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रवादीच्या जवळपास सर्व आमदारांचा पाठिंबा आपल्या कडे असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं. कायदा आणि कारवाईचा विचार करुनच हे पाऊल उचललं आहे. नियमाच्या बाहेर जाऊन काहीही काम केलेलं नाही असं मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितलं. आपल्याकडे ४० पेक्षा जास्त आमदार आहेत आणि सगळ्यांच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नव्या जोमानं वाटचाल करेल. येत्या काळात आणखी काही नियुक्त्या केल्या जातील असही भुजबळ यांनी म्हणाले. दरम्यान, यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य पदाधिकारी पोहाचेले आहेत.