मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फळबागांसाठी एकरी ५० हजार तर अन्य पिकांसाठी २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते.

मराठवाड्यात प्रथमच सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्यानं खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. त्यामुळे प्रशासनानं नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावे, नुकसान भरपाई रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दरेकर यांनी यावेळी दिला.

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरामुळे कापूस, सोयाबीन ह्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. खासदार डॉ. ङ्गौजिया खान यांनी पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव, नावकी, माटेगाव व पांगरा ढोणे ह्या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.