पुणे जिल्हयातील पूरस्थितीचा घेतला आढावा

पुणे : पुणे जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे  नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल. आपत्तीच्या काळात जिल्हयातील सर्व यंत्रणांनी समन्वय  ठेवत सतर्क रहावे, असे निर्देश महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

पुणे जिल्हयात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील पुणे जिल्हयाच्या दौ-यावर आले होते. बालेवाडी येथील श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल सभागृहात पूरस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन ,भूकंप पुनर्वसन संजय (बाळा ) भेगडे, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव,  सर्वश्री आमदार बाबुराव पाचरणे,  राहुल कुल, योगेश टिळेकर, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे जिल्हयातील बहुतांश धरणे भरली आहेत. धरणक्षेत्रात पाऊस सुरूच आहे, आणखी दोन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत धरणांचे सनियंत्रण करावे, आरोग्य विभागाने दक्ष राहावे, आवश्यक त्या लशीसह औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, गरजेप्रमाणे औषधांची मागणी तातडीने नोंदवावी,  सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करावी, तसेच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यासंबंधिचा अहवाल सादर करावा. असुरक्षित रस्ते, पुल बंद करा, कोणतीही दुर्घटना होणार नाही, याबाबतची काळजी घ्यावी, पुणे जिल्हयात पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहील, असा अंदाज वेध शाळेने वर्तविला आहे.  त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, प्रशासन वेळोवेळी करत असलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पालकमंत्री  श्री. पाटील यांनी केले.

राज्यमंत्री भेगडे यांनी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी पाण्याचा साठा होवून खोळंबा होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना केली.

जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, पुणे जिल्हयात 917.48 मिलीमीटर पाऊस झाला आहे. बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर वगळता उर्वरित सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची परिस्थिती आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून तीन मोठया नद्या वाहत आहेत, त्यामुळे योग्य दक्षता घेतली जात आहे. पुरस्थितीमुळे आतापर्यंत 3 हजार 343 कुटुंबाला स्थलांतरीत करण्यात आले असून यामध्ये 13 हजार 336 नागरिकांचा समावेश आहे. आपत्ती कालावधीत सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून पूरबाधीत व्यक्तींचे पंचनामे करून नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे सांगून पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी मनपार्फे करण्यात आलेल्या उपायायोजनांची माहिती दिली. भोजन, निवास व्यवस्था व स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापनाशी सबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

लोणावळा, सांगवी व पिंपळेनिलख येथे भेट

लोणावळा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांत्वन केले. यावेळी पुनर्वसन राज्य मंत्री संजय (बाळा) भेगडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, उप विभागीय अधिकारी संजय भागडे, लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार तसेच पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

लोणावळ्यातील हनुमान टेकडी येथे भिंत पडून कुणाल अजय दोडके या 12 वर्षाच्या मुलाचे निधन झाले होते. भांगरवाडी येथे भिंत पडून जयप्रकाश जगन्नाथ नायडू (42 वर्षे) यांचे निधन झाले. पालकमंत्री श्री. पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश यावेळी प्रदान केले. तत्पूर्वी, परमार हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी मुलगी नंदिनी अजय दोडके हिची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच सांगवी व पिंपळेनिलख भागातील पूरबाधितांच्या भेटी घेवून तेथील परिस्थितीची माहिती घेतली.