मुंबई : करोनाच्या संकटातून सावध पावलं टाकत केंद्र सरकारनं शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांवर सोपवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी-पालकांचं लक्ष लागलं होतं. अखेर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयं बंद होती. आता राज्य अनलॉत होत आहे. त्यातच शाळाही सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याची तयारी राज्य शासन करत आहे. सर्व नियम व अटी ठेवूनच विद्यार्थांना प्रवेश दिला जाणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.