नवी दिल्ली : प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि मेघालय सरकारच्या मदतीने ई गव्हर्नन्स 2019 विषयीच्या 22 व्या राष्ट्रीय परिषदेचे 8 आणि 9 ऑगस्ट रोजी शिलाँगमध्ये आयोजन केले आहे.

ईशान्येकडील राज्यांचा विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन, सौर ऊर्जा विभाग आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या नव्या सरकारमधील 100 दिवसांच्या कार्यकाळातील उपक्रमांचा एक भाग म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारची परिषद पहिल्यांदाच देशाच्या इशान्य भागात होत आहे. या परिषदेमुळे ई गव्हर्नन्स विषयक विविध उपक्रमांची योग्य प्रकारे आखणी आणि अंमलबजावणी करणे, विविध समस्यांचे निवारण, परस्परांच्या अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि यशाची आखणी करण्‍यासाठी संबंधितांना एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे.

या परिषदेत 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे 500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.