नवी दिल्ली : नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 5 ऑगस्ट 2019 रोजी डॉ.एन. शेषगिरी व्याख्यान 2019 या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. आपल्या देशातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा दर्जा उंचावण्याची गरज नारायण मूर्ती यांनी यावेळी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजे असे ते म्हणाले. डॉ. शेषगिरी यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.  शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कौशल्य आणि जलद गतीची निर्णय क्षमता असे मिश्रण असलेले ते महान देशभक्त होते, अशा शब्दात नारायण मूर्ती यांनी शेषगिरी यांना आदरांजली वाहिली.

यावेळी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय सहानी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. नॅशनल इन्फरमॅटीक्स सेंटरला सरकारचा माहिती तंत्रज्ञानाचा आधारस्तंभ बनवण्यामध्ये मोठे योगदान दिल्याबद्दल डॉ. एन. शेषगिरी यांची यावेळी संजय धोत्रे यांची प्रशंसा केली. डिजिटल इंडिया उपक्रमासाठी या संस्थेने अनेक उपाय सुचवले असे त्यांनी सांगितले.