मुंबई : नाशिक जिल्ह्यातील लासलगांव-विंचूर सह. 16 गांवे, धुळगाव (भिंगारे ता. येवला) व 17 गावे, राजापूर व 40 गांवे, नांदूर मध्यमेश्वर, खडकमाळेगांव व सारोळे खु. ता. निफाड या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, नाशिक जिल्ह्यातील इतर पाणी पुरवठा योजनांचा आढावा नाशिकचे पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात घेतला.
यावेळी श्री.भुजबळ म्हणाले, लासलगांव-विंचूर हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथील पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने लासलगांव-विंचूर सह 16 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामाला मंजूरी देण्यात यावी. भिंगारे, ता. येवला सह 15 गांवे, राजापूर व 40 गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा नव्याने प्रस्ताव मान्य करावा. नांदूर मध्यमेश्वर, खडकमाळेगांव व सारोळे खु. ता.निफाड येथील पाणी पुरवठा योजनांचा जलजीवन मिशन कृती आराखड्यात समावेश करावा. तसेच जिल्ह्यातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांची गरजेनुसार कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करावीत.
यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर करावा.
या बैठकीस पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, तसेच पाणीपुरवठा विभागाचे मंत्रालय व नाशिक जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.