निवडणुकीदरम्यान काळा पैसा आणि रोख रकमेच्या वापराला आळा घालण्यासाठी आयकर विभागाने उचललेल्या पावलांची महासंचालकांनी दिली माहिती
मुंबई : राज्यातील सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काळा पैसा आणि रोख रक्कमेच्या वापरावर आळा घालण्यासाठी आयकर विभाग महासंचालनालय (तपास) अहोरात्र काम करत आहे असे आयकर विभागाचे (तपास) महासंचालक नितीन गुप्ता यांनी आज मुंबईत सांगितले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 21 सप्टेंबर 2019 रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत आयकर विभागाने 4 कोटी रुपयांची बेकायदेशीर रोख रक्कम जप्त केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आयकर विभागाने उचललेल्या पावलांबद्दल विस्तृत माहिती देतांना ते म्हणाले की, मुंबई विभागाचे प्रधान संचालक आनंद कुमार यांची संपूर्ण महाराष्ट्रासाठी आयकर विभागाचे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. खुल्या आणि नि:पक्ष निवडणुका व्हाव्या यासाठी आयकर विभाग अनेक कायदा अंमलबजावणी संस्था आणि इतर सरकारी विभागांशी समन्वय साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
रोख रक्कमेच्या हालचालींबाबत गुप्तचर विभागाने दिलेली माहिती एकत्रित करण्यासाठी तसेच यासंदर्भात त्वरित कारवाई करण्यासाठी एक नियामक प्रणाली कार्यरत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई, पुणे आणि नागपूर येथे 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून 40 अतिशीघ्र पथकं कार्यरत असून यामध्ये मुंबईतील सहा पथकांचा तसेच विविध जिल्हे आणि मतदार संघातील पथकांचा समावेश आहे. याशिवाय बेहिशोबी रोख रक्कमेबाबत लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील कार्यरत असणाऱ्या विमानतळांवर हवाई गुप्तचर विभाग स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
यासंदर्भात एक सर्वंकष जागृती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. वृत्तपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमं, जाहिरात फलक तसेच सोशल मीडियाचा यासाठी वापर करण्यात येत आहे. यामध्ये
- हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांतील वृत्तपत्रांमधील जाहिराती
- महत्वाची ठिकाणं आणि विमानतळांभोवती प्रचारफलक
- एफ.एम. वाहिन्यांवरून नभोवाणी प्रचार
- फेसबुक पेजद्वारे सोशल मीडियावर प्रचार
- बसवरील फलक
- मान्यवरांच्याद्वारे (दृक/श्राव्य) संदेश
आयकर विभागाने टोल फ्री क्रमांक , व्हॉटस् ॲप क्रमांक आणि फॅक्स क्रमांक पुरवले असून याद्वारे नागरिक संशयास्पद हालचालींबाबत आयकर विभागाला माहिती देऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले.
विभाग | टोल फ्री क्रमांक | व्हॉटस ॲप क्रमांक | फॅक्स क्रमांक |
मुंबई | 1800221510 | 9372727823
9372727824 |
022-22045936 |
पुणे | 18002330700
18002330701 |
7498977989 | 020-24268825 |
नागपूर | 1800233785 | 9403391664 | 0712-2525844 |
नागरिक/पोलीस तसेच इतर संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर क्यूआरटीच्या माध्यमातून पडताळणी प्रक्रिया केली जाते आणि जर ही माहिती विश्वासार्ह आढळली तर 1961 च्या आयकर कायद्या अंतर्गत योग्य ती कारवाई केली जाते, असे नितीन गुप्ता यांनी सांगितले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 28 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून यामध्ये मुंबईतील 16 कोटी रुपयांचा समावेश असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.