राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वडाळा येथे एका व्यक्तीस अटक केली असून अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून एकूण 3 लाख 91 हजार 675 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागास मिळालेल्या माहितीच्या आधारे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विभागीय उप-आयुक्त सुनील चव्हाण, संचालक उषा वर्मा, अधीक्षक सी.एच.राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने वडाळा येथे नुकतेच बनावट मद्य पुरविणाऱ्या इसमास ताब्यात घेतले.
हा इसम समाजमाध्यमांद्वारे महाविद्यालयीन तरूणांना घरपोच सेवा देणारे संदेश पाठवत असे. विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे हलक्या प्रतीचे मद्य टाकून वितरित करत असे. या मद्याची पॅकिंग तो स्वत: करीत होता, त्याच्या वाशी येथील घरी उच्च प्रतीच्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या, लेबल, पॅकिंगचे सामान व हलक्या प्रतीचे मद्य जप्त करण्यात आले.
या कार्रवाईत मुंबई शहरचे निरीक्षक विलास बामणे, दुय्यम निरीक्षक अजय बगाटे, दुय्यम निरीक्षक विनोद शिंदे, जवान भालचंद्र सकपाळ, जनार्दन पवार, सदानंद कांबळे इत्यादिंनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक विलास बामणे करीत आहेत.
विधानसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाच्या आणि मद्याच्या वापराला आळा घालण्याचे निर्देश राज्यासाठीच्या विशेष खर्च निरीक्षक श्रीमती मधू महाजन, मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कार्यरत आहेत.