मुंबई (वृत्तसंस्था) : कालपासून अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढचे तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा सांगितला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, तसंच इतर संबंधित विभागांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.