नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे आणि पेगॅसस पाळत प्रकरणासह विविध मुद्दयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेत पहिल्या तहकूबीनंतर पुन्हा कामकाज सुरु होताच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक आणि डाव्या पक्षाच्या सदस्य पुन्हा हौद्यात उतरुन सरकारच्या विरोधात घोषणा देऊ लागले या गदारोळातच आंतरदेशीय नौका विधेयक आणि आवश्यक संरक्षण सेवा विधेयक सभागृहात मांडण्यात आले. कामकाज चालू देण्याचे आवाहन पीठासन अधिकाऱ्यांनी विरोधी सदस्यांना केले. मात्र गोंधळ कायमच राहिला त्यामुळे कामकाज पुन्हा तहकूब करावे लागले. त्याआधी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्यांवर तहकूबीची सूचना दिली होती. इतर मागण्यांवरुनही विरोधकांची घोषणाबाजी चालूच होती, त्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केले होते. राज्यसभेतही याच मुद्द्यांवरुन गदारोळ झाल्यामुळे उपसभापती हरिवंश यांनी दोनदा कामकाज तहकूब केले. खेलो इंडिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रोत्साहन योजनेअंतर्गत ऑलंपिक २०२८ आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी ग्रामीण भागांसह देशभर गुणवत्ता शोध सुरु असून त्यातून खेळाडू तयार केले जात आहेत, असं क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत सांगितले.