मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कालपासून सोसाट्याचा वारा, आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली असून राजधानी मुंबईला जोडणाऱ्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला त्याचा फटका बसला आहे. मुंबईत शनिवारपासून मुक्कामाला आलेल्या पावसाचा जोर आता कमी झाला असला तरी आगामी दोन दिवसांकरता दक्षतेचा इशारा वेधशाळेने दिला आहे. शहरात काल सरासरी १०० मिलीमीटर पाऊस झाला, कुठेही पाणी साचलेले नाही. रेल्वे उपनगरी वाहतूक काही स्थानकांपर्यंत सुरळीत आहे. मात्र शेजारी जिल्ह्यांमधे अनेक ठिकाणी पावसानं काल २०० मिलीमीटरची उंची गाठली. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आले असून रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेवर वाहतूक सुरळीत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. टिटवाळा ते कसारा आणि अंबरनाथ ते लोणावळा स्थानकांदरम्यान काही ठिकाणी रूळ वाहून गेल्याने किंवा रुळांवर मोठमोठे दगड, मोठ्या प्रमाणात चिखल आल्याने रेल्वे वाहतूक बंद ठेवली आहे. रुळांवरचा राडारोडा हटवण्याचे काम सुरु आहे. असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं. ३२ गाड्यांचा प्रवास मधल्या स्थानकांवर खंडित करण्यात आला, १९ गाड्या इतर मार्गांवर वळवण्यात आल्या तर २५ गाड्या आज रद्द करण्यात आल्या. पर्यायी बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली. कोकण रेल्वेच्या ९ गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या.