मुंबई (वृत्तसंस्था) : पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणं शक्य नाही, त्या गावातल्या घरांना मोफत सौर दिव्यांचं वितरण करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. त्यांनी काल रायगड जिल्ह्यात पेण, महाड, नागोठणे इथल्या पूरग्रस्त भागांची तसंच महावितरण आणि महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या  रायगड जिल्ह्यासह कोकणातली वीज पुरवठा यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.पूरग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनेक भाग प्रकाशमान केले आहेत. त्याबद्दल उर्जा मंत्र्यांनी त्यांची प्रशंसा केली.