नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात साडेनऊ टक्के राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेविषयी IMF ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात हा अंदाज दिला आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०२२ – २३ मधे हा दर साडे आठ टक्के राहील असेही अहवालात म्हटले आहे. गेल्या एप्रिलमधे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था ६ पूर्णांक ९ दशांश टक्के वेगाने वाढेल असा अंदाज नाणे निधीने व्यक्त केला होता.

कोविड १९च्या दुसऱ्या लाटेतून भारतीय अर्थव्यवस्था हळू हळू सावरत असून गेल्या मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात वाढीचा दर ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहिला. मात्र पुढच्या वर्षात इतर देशांच्या तुलनेत तो चांगला राहील असे IMFने म्हटले आहे. नाणे निधीच्या प्रमुख अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले की जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर यंदा ६ टक्के राहील तर पुढच्या वर्षी ४ पूर्णांक ९ दशांश टक्के राहील असा अंदाज आहे. मात्र एकूण अर्थव्यवस्थांमधे विषमता वाढण्याची शक्यता IMF ने व्यक्त केली आहे. काही देशांमधे लसीकरण अपेक्षेपेक्षा वेगाने झाले असून त्यामुळे अर्थव्यवस्था वेगाने रुळावर आली आहे. तर भारतासह काही देशांमधे लशींचा तुटवडा असून त्यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग मंदावला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.