पुणे : परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी दृकदृश्य प्रणालीद्वारे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार सर्वश्री अशोक पवार, संजय जगताप, ॲड. राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अतुल बेनके यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. स्थलांतरीत नागरिकांना जेवण, निवाऱ्यासोबतच इत्यादी मुलभूत सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्यात. सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच विभागातील इतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यंत्री श्री.पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बदलत्या हवामानानुसार पडणाऱ्या पावसाची नोंद घेत विभागातील परिस्थितीबाबत प्रशासकीय यंत्रणा सतर्क असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.