मुंबई (वृत्तसंस्था) : काद्यांवरच्या निर्यात बंदीनंतर, कांद्याचे उतरलेले भाव आज एकदा तेजीत आल्याचं चित्र नाशिक जिल्ह्यातल्या कृषी बाजारांमध्ये दिसलं. नाशिकमधल्या कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला प्रति क्विंटल ८ हजार ५०० रूपये इतका उच्चांकी, तर सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रूपये इतका भाव मिळाला. दिंडोरी तालुक्यातल्या वणी इथं आठ हजार शंभर रूपये इतका कमाल भाव मिळाला.

लासलगाव बाजार समितीतही आज कांद्याला कमीत कमी १ हजार ६०० तर जास्तीत जास्त ६ हजार ८९१ आणि सरासरी ६ हजार २०० रूपये इतका भाव मिळाला. विंचूर इथं आज प्रति क्विंटल कांद्याचा भाव सहा हजार रूपये इतका होता. 

गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे झालेलं नुकसान, तसंच चातुर्मास संपल्यानंतर कांद्याच्या मागणीत वाढ झाल्यानं कांद्याचे भाव वाढल्याचं कृषी बाजार विश्लेषकांनी म्हटलं आहे.