मुंबई : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

महिलांच्या प्रश्नासंदर्भातील कामकाज तसेच कोविड-19 चे जगावरील व भारतावरील परिणाम तसेच त्यावरील उपाययोजना यासंदर्भात मिनिस्टर कौन्सेलर ब्रिटीश हायकमिशन श्रीमती कॅथी बज व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यात सविस्तर चर्चा झाली.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोविड महामारीमध्ये निर्माण झालेले विविध प्रश्न विस्तृतपणे मांडले. नैसर्गिक आपत्तीमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना होणाऱ्या त्रासाबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. महामारीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि केंद्र शासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे भारतामध्ये याचा प्रसार लवकर आटोक्यात आणण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विधिमंडळ सदस्य महिलांच्या प्रश्नासंदर्भात अत्यंत संवेदनशील असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ.गोऱ्हे यांनी जागतिक प्रश्नाकडे पाहताना महिलांच्याही दृष्टीकोनातून पहावे व प्रगतीमध्ये कोणीही पाठीमागे राहू नये या युनोच्या या दशकाच्या ब्रीदवाक्याचा उल्लेखही केला.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी जेंडर बजेट मध्ये तरतूद केली. तसेच सुरक्षित पर्यटनाला पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी प्राधान्य दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. बीजिंग येथील १९९५ च्या जागतिक महिला परिषद आणि त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यामधील जेंडर इक्वलिटी यावर त्यांनी भर दिला. १ ऑक्टोबर २०२० रोजीच्या वेबिनारमध्ये भाग घेऊन याबाबत विस्तृत विवेचन केल्याचेही सांगितले.

मिनिस्टर कौन्सेलर ब्रिटिश हाय कमिशन श्रीमती कॅथी बज यांनी डॉ.गोऱ्हे यांचा  काम करण्याचा आवाका व महिलांच्या प्रश्नांसंदर्भात केलेले काम यांचे कौतुक केले.  इंग्लंड आणि भारतामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिस संदर्भात एक करार झाल्याचे सांगितले. तसेच इंग्लंडमध्ये आयुर्वेदिक मेडिसिनचा प्रचार करण्याच्या हेतूने इंग्लंड शासनाने विविध उपक्रम घेतल्याचेही सांगितले. स्त्री-पुरुष समानता व महिला सक्षमीकरण हे जागतिक पातळीवर डॉ.गोऱ्हे यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत असे त्या म्हणाल्या.

या बैठकीला श्री.ऍलन गेम्मेल उपउच्चायुक्त, श्रीमती कॅथरीन बर्न, डेप्युटी मिशन हेड, श्रीमती बेथ येट्स, फर्स्ट सेक्रेटरी पोलिटिकल अफेअर्स व सचिन निखार्गे हजर होते.