पुणे : पुणे जिल्हयातील मुळा, मुठा व इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुरामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या पुणे शहरा मधील जुनी सांगवी, दापोडी , पिंपरी, रावेत, रहाटणी, वाकड, आदर्शनगर, शांतीनगर, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, खिलारे वस्ती इत्यादी परिसरातील पुराने बाधित झालेल्या सुमारे 1685 कुटुंबांचे तर अप्पर तहसिलदार, पिंपरी-चिंचवड यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सादर केलेल्या अहवालानुसार 2227 कुटुंबांचे स्थानिक पातळीवर स्थलांतर करण्यात आलेले आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या आपत्तीग्रस्तांना मोफत धान्याचा पुरवठा करण्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वितरणाचा आढावा घेवून तात्काळ धान्यपुरवठा करण्याचे आदेश दिले. या आढावा बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या दिनांक 8 मार्च व 7 ऑगस्ट 2019 च्या शासननिर्णय व पत्रानुसार 10 किलो गहू व 10 किलो तांदळाचा मोफत पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने माहे ऑगस्ट 2019 मधील मंजूर अन्नसुरक्षा नियतनातून वाटप करुन शिल्लक राहिलेल्या नियतनातून परिमंडळ अधिकारी यांच्याकडून प्राप्त बाधित कुटूंबाच्या यादीनुसार व दुकानदार निहाय दिनांक 5 ऑगस्ट 2019 च्या आदेशाप्रमाणे पुणे शहर व पिंपरी-चिंचवड, भोसरी इ. बाधित ठिकाणच्या परवानाधारक दुकानांमधून या मोफत धान्यांचे वितरण करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.