????????????????????????????????????

पुणे :  फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची गरज असल्याचे सांगतानाच महाराष्ट्र हे फलोत्पादनासाठी उज्ज्वल भवितव्य असलेले राज्य असल्याचे प्रतिपादन  रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व फलोत्पादन विभागाच्या विविध योजनासंदर्भात फलोत्पादनमंत्री क्षीरसागर यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सुहास दिवसे, संचालक प्रल्हाद पोकळे यांच्यासह राज्यातील विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.

फलोत्पादन मंत्री क्षीरसागर म्हणाले, महाराष्ट्र अनेक  क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे, त्यात कृषी तसेच फलोत्पादन क्षेत्रही आघाडीवर आहे. कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. नवे तंत्रज्ञान, नवीन बदल स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगून मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत शेततळयाचे आकारमान, शेततळयासाठीचे आवश्यक अनुदान आदी विषय तातडीने मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेती उत्पादनासाठी आवश्यक बाजारपेठ मिळविण्यासाठी शासनाचे पाठबळ देणार असल्याचे सांगून फलोत्पादनमंत्री श्री. क्षीरसागर म्हणाले,  फळप्रक्रियेसंदर्भात विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. कोकणात काजू विकास समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असून काजू लागवडक्षेत्र वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून काजू विकासासाठी निधीची भरीव तरतूद केली असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या फळबागा उभारणीसाठी  शेतक-यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी आयुक्त दिवसे म्हणाले, फलोत्पादन क्षेत्राला अन्यन्यसाधारण महत्व आहे.  फळ निर्यातीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. शेतक-यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी कृषी अधिका-यांच्या राज्य पातळीवर कार्यशाळा घेण्यात येतील. यासोबतच राज्यात शेतीशाळांचे मोठया प्रमाणात आयोजन करून शेतीशाळेतूनही बाजारपेठ व्यवस्थेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संचालक प्रल्हाद पोकळे यांनी फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांसदर्भात माहिती दिली. सल्लागार गोविंद हांडे यांनी फलोत्पादन क्षेत्रातील संधी या विषयावर माहिती दिली.