पुणे : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर झाल्याने अनेक कुटुंबाचे संसार उद्धवस्त झाल्यामुळे त्याठिकाणी मदतीचा ओघ अनेक ठिकाणाहून सुरू झाला आहे. उपजिल्‍हाधिकारी सुरेखा माने यांनीही मदत करुन माणुसकीचा प्रत्‍यय दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यात तहसीलदार पदावर कार्यरत असताना जलसंधारणाचे काम उल्लेखनीयरित्या केल्याने उपजिल्हाधिकारी  श्रीमती सुरेखा माने  यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले होते, त्यांनी पुरस्काराची सर्व रक्कम पुरग्रस्तांसाठी  देऊन संवेदनशीलतेचा  प्रत्यय दिला.मदतीचा धनादेश सुरेखा माने यांनी जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍याकडे सुपूर्द केला. यावेळी अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे उपस्थित होते.

पुण्‍याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुद्धा  सांगली  व कोल्हापूर मधील पूरग्रस्तांना मदत करण्‍यासाठी तातडीने कक्ष उभारून आवश्यक ती कार्यवाही  करण्‍यासाठी वरिष्ठ महसूल अधिका-यांना  सूचना दिल्या. तसेच पुणे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती चा आढावा घेऊन विविध विषयासंदर्भात तातडीने जिल्हा स्तरावर  समन्वय अधिका-यांच्‍या नियुक्त्या करून कामाला सुरुवात देखील केली आहे. बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपस्थित महसूल अधिका-यांनीही  पुरग्रस्तांसाठी  एक दिवसाचे  वेतन देण्याचे जाहीर केले.

याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी समीक्षा चंद्रकार व  अन्य उपजिल्हाधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.