मुंबई : राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कुटुंबे निराधार होत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने अन्नधान्याची मदत व्हावी यासाठी शासनामार्फत आपद्ग्रस्त व निराधार कुटुंबांना प्रती कुटुंब 10 किलो गहू, 10किलो तांदूळ व 5 लिटर केरोसीन मोफत देण्यात येणार आहे. अन्नधान्य व केरोसीन वाटपाचे काम एका आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडाल्यामुळे निराधार होणाऱ्या कुटुंबांना अन्न धान्य वाटपाची कार्यपद्धती अन्न व नागरी पुरवठा विभागाने एका परिपत्रकाद्वारे निश्चित केली आहे. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे जाहीर केल्यानंतर पूरबाधित कुटुंबांची संख्या त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण, बाधित कुटुंबांची यादी इ. आवश्यक बाबी जिल्हास्तरीय महसूल यंत्रणेने संबधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळविल्यानंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गोदामात शिल्लक असलेल्या साठवणुकीतून तात्काळ वाटप सुरु करण्यात येणार आहे.
अन्न धान्याची अतिरिक्त मागणी असल्यास शासनामार्फत तात्काळ पुरवठा करण्यात येईल. यासाठीही भारतीय अन्न महामंडळाकडून अन्नधान्याची उचल करुन वाटप केलेल्या अन्नधान्याचे समायोजन करावे, अशा स्पष्ट सूचना विभागामार्फत संबधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.