नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा पुढचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जारी केला.

प्रधानमंत्र्यांनी एक बटण दाबून ९ कोटी पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली. प्रधानमंत्र्यांनी यावेळी ६ राज्यांमधल्या शेतकऱ्यांशी संवादही साधला. पीएम-किसान आणि सरकारच्या इतर कल्याणकारी योजनांबाबतचे अनुभव शेतकऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतले. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमधे १ लाख १० हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे, असं मोदी यांनी सांगितलं.

नव्या कृषी कायद्यांना विरोध करुन काही पक्ष त्यांचा राजकीय अजेंडा रेटू पाहात आहेत, आणि कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेतली जात असल्याच्या वावड्या उडवत आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमा व्हावा आणि उत्पन्न वाढावं, पिकाला विमा संरक्षण मिळावं, शेतमालाला चांगली किंमत मिळावी यासाठी पावलं उचलत आहे.

सरकार स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करत आहे, असं त्यांनी सांगितलं. कृषी सुधारणांद्वारे सरकारनं शेतकऱ्यांना अधिक चांगले पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यावेळी उपस्थित होते.

आज जमा केलेल्या रकमेचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे, असं ते म्हणाले. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावं आणि सरकारशी चर्चा करावी, असं आवाहन त्यांनी केलं.