नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्र एम. व्यंकय्या नायडू यांनी सर्व देशवासियांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळ हा उत्साह आणि आनंद द्विगुणीत करणारा सण आहे. हा सण संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करो. असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
मानवाच्या कल्याणासाठी प्रभू येशू यांनी दिलेल शांती, दया आणि माफीचा संदेश सर्वांनी अंगिकारायला हवा, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या सणानिमित्त सर्व नातलग मित्र एकत्र येऊन हा सण उत्साहात साजरा करतात, मात्र यंदा कोरोनामुळे लागू असलेल्या नियमांमुळे हा सण नेहमीप्रमाणे साजरा करता येणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
नाताळ हा प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. येशु ख्रिस्तांची शिकवण ही माणसातल्या देवत्वाला माननारी होती, त्यामुळेच त्यांनी करूणामयी, क्षमाशील आणि प्रेमळ मार्गाने जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांची हीच शिकवण आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि संपन्नता घेवून येवो, अशी प्रार्थना राज्यपालांनी आपल्या संदेशाद्वारे केली आहे.