नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान रेल्वेसह देशभरात वाहतुकीसाठी धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पालेभाज्या तसंच फळांना सरसकट पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला, द्राक्ष, ॲपल बोरसह सर्वच प्रकारच्या फळांच्या उत्पादकांना लाभ होणार आहे.

या निर्णयाचा फायदा नाशिक जिल्ह्यातील दहा हजार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होईल असा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष, बोर तसंच काही भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.

सर्वच प्रकारची फळं आणि भाजीपाला वाहतुकीवर पन्नास टक्के सबसिडी मिळावी यासाठी  खासदार हेमंत गोडसे यांनी कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.