मुंबई (वृत्तसंस्था) : मॅग्नेटीक महाराष्ट्र दोन अंतर्गत आज एमआयडीसी अर्थात, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि विविध कंपन्यां यांच्यात गुंतवणूकीसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यामुळे १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार ८५० कोटींची गुंतवणूक राज्यात होत आहे. तसंच यामुळे सुमारे २३ हजार १८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

मागील सामंजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे, असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मित्सुबिशी इलेक्ट्रीक इंडिया, ओरिएंटल ऍरोमॅटिक्स, अदानी एन्टरप्राइजेस आणि एस्सार इंडिया अशा १५ कंपन्यांचा यात समावेश आहे.

राज्यात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. गुंतवणूकदार आणि राज्य शासन या दोघांत एकमेकांवर विश्वास असून राज्य या कोरोना परिस्थितीत नुसते बाहेर नाही पडणार तर अधिक सामर्थ्यानं देशात आघाडी घेईल, असंही ते म्हणाले.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव उदयोग वेणूगोपाल रेड्डी, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन, एफडीआय शेर्पा प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.