कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.
जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत असून शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. पाणी, आगपेटी,मेणबत्ती, इंधन, पालेभाज्या, दूध इत्यादी वस्तू एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत आहेत. जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री करणारे आढळल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. याबाबत वजनेमापे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची यंत्रणा अधिक सक्रीय केली आहे.
पूर परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे असे भासवून जादा दराने वस्तूंची विक्री करणे तसेच अशा स्वरुपाचे संदेश सोशल मीडियावर टाकून अफवा फसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याबाबत पोलीस विभागही दक्ष असून पूरग्रस्तांसाठीच्या मदतकार्य तसेच तक्रारींसाठी जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2655416 आणि 1077 असा आहे. जनतेने आपल्या तक्रारी नियंत्रण कक्षाकडे कराव्यात असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.
जिल्ह्यात एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबतही प्रशासन दक्ष असून आज सकाळी सात हजार गॅस सिलेंडर शिरोली नाका येथे आले असून ती सिलेंडर व उर्वरित टँकर शहरात आणण्याची कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत असल्याने गॅस पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
पूरग्रस्तांसाठी निर्माण केलेल्या संक्रमण शिबिराच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील अपार्टमेंटमध्ये पाणी आले आहे अशा ठिकाणी चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच समाज माध्यमातून काही जण अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावरही फौजदारी दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.