नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाराणसीमधील विविध विकासकामांमुळे इथल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि त्याचा लाभ संपूर्ण पूर्वांचलला होईल. गंगाविकास आणि त्याचबरोबर वाराणसीचा सर्वांगीण विकास हे सरकारचं कायमच प्राधान्य राहिल आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विकास करत असताना व्होकल फॉर लोकल हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे, असं आज स्पष्ट केलं आणि त्याच्याही पुढे जाऊन लोकल फॉर दिवाळी हा नवा मंत्र अंगीकारण्याचं आवाहनही बनारसवासियांना आणि तमाम देशावासियाना केलं.
वाराणसी मतदार संघातल्या सुमारे 614 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडलं. त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मंत्रीगण उपस्थित होते. सुमारे दीड हजार लोकही या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी शहरात 6 ठिकाणी मोठे पडदे लावण्यात आले होते. मोदी यांच्या हस्ते 220 कोटी रुपये खर्चाच्या 16 प्रकल्पांच उद्घाटन करण्यात आलं आणि चारशे कोटी रुपये खर्चाच्या नव्या विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात आलं. आजच्या या कार्यक्रमात दशाश्वमेध घाट आणि खिडकीया घाटाचा पुनर्विकास,
पोलीस दलासाठी नव्या छावण्यांची उभारणी यासह गिरिजादेवी सांस्कृतिक संकुलातील
बहुउद्देशीय सभागृहाचं नूतनीकरण आणि इतर पर्यटन स्थळांच्या विकासकामांचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. सारनाथ लाईट शो उद्घाटन आज करण्यात आलं. गंगा पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्पाला सरकारनं सर्वाधिक प्राधान्य दिलं असून काशीमधील दळणवळण सुकर करणं आणि विजेच्या तारांचं त्रासदायक जंजाळ काढून टाकण्याच्या कामाला वेग दिला आहे. रस्ते विकासामुळे बनारसचा कायापालट होत असून इथल्या विमानतळावरून आता दररोज 48 उड्डाण होतात. त्यामुळेच प्रथमच इथून फळ, भाजीपाला आणि तांदळाची निर्यात झाली. जलमार्ग विकासही वेगानं होत असून पर्यटकांना ट्रॅफिक जॅममध्ये वेळ घालवावा लागू नये, यादृष्टीनं सुविधा निर्मिती होत असल्याचं मोदी म्हणाले.
स्थानिक उत्पादकांनी, कारागिरांनी तयार केलेली उत्पादनं आपण वापरली तर अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल, या लोकांनी त्यासाठी गाळलेला घाम, वापरलेली बुद्धिमत्ता यांचही चीज होईल, असं सांगून मोदी यांनी जनतेला दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीजेच्या शुभेच्छाही दिल्या.