मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे रत्नागिरी आगारातील एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. आज राज्याच्या विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांचं आक्रोश आंदोलन सुरु आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आज आपापल्या घरी आक्रोश आंदोलन केलं. एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असून दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाकडून वेतनाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. कामगारांत प्रचंड असंतोष वाढल्याने आज प्रलंबित वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी कर्मचार्यांबनी कुटुंबासह आक्रोश केला. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यात आंदोलन करण्यात आलं. सुट्टी असणार्यांनीही यात सहभाग घेतला. दरम्यान आंदोलकांवर कारवाई करण्याचा इशारा महामंडळानं दिल्यामुळे आंदोलक अधिकच संतापले आहेत.
धुळे जिल्ह्यातही एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या घरी कुटुंबासह उपाशी राहत आक्रोश आंदोलन केलं. अनेक ठिकाणी हे आंदोलन सामूहिक पद्धतीनंही केलं गेलं. सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या घरात उपाशी राहत आक्रोश आंदोलन केलं.
सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून जन- आक्रोश आंदोलनाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. जालना इथंही एसटी कर्मचाऱ्यांनी घरासमोर सहकुटुंब आक्रोश आंदोलन केलं.