नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फटाक्यांच्या माध्यमातून वाढणारे प्रदूषण लक्षात घेता राष्ट्रीय हरित लावादानं राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली आहे. आज मध्यरात्रीपासून ही बंदी लागू होत असून ती 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. जगभरात अलीकडच्या काळातील कोविड-19 चा वाढता प्रकोप आणि देशातील तसच राजधानी दिल्लीतील परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं लवादानं म्हटलं आहे. कोविड-19 चा धोका लक्षात घेऊन देशभर फटाक्यांवर अशी बंदी घालावी किंवा तत्सम उपाययोजना कराव्यात, असं आवाहन लवादान सर्व राज्यांना केलं आहे.
राजधानी नवी दिल्ली इथल्या हवेची गुणवत्ता अद्याप खालावलेलीच आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजता दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 461 नोंदवला गेला. 201 ते 300 दरम्यानचा निर्देशांक हवेची खराब गुणवत्ता दर्शवितो. 301 ते 400 दरम्यानची गुणवत्ता अत्यंत खराब तर 401 ते 500 दरम्यानचा निर्देशांक आत्यंतिक निकृष्ट गुणवत्ता दर्शवतो