मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री.परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली आणि यावर मार्ग काढण्यात आला आहे.
शासनाकडून एसटीसाठी पुढील सहा महिन्यासाठी आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
श्री. परब म्हणाले, टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे. हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लवकरच एसटीचे अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडून आता आर्थिक मदत मिळाल्याने एसटीच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचेही श्री.परब यांनी सांगितले.