मुंबई (वृत्तसंस्था) : हवेची गुणवत्ता पातळी ‘खराब’ असलेल्या शहरांमध्ये येत्या ३० तारखेपर्यंत फटाक्यांच्या विक्री आणि वापरावर बंदी घालण्याचा निर्णय, राष्ट्रीय हरित लवादानं घेतला आहे. यामध्ये राज्यातल्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह औरंगाबाद, लातूर, जालना, पुणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, बदलापूर, अमरावती आणि अकोला या शहरांचा समावेश आहे.

ज्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम किंवा त्यापेक्षा चांगली आहे, त्याठिकाणी फक्त ‘ग्रीन क्रॅकर्स’ म्हणजेच प्रदूषणमुक्त फटाके उडवायला परवानगी दिली आहे. दिवाळीदरम्यान दररोज फक्त दोन तास फटाके वाजवायला परवानगी असेल.

छठ पूजा, नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठीही हेच नियम लागू केले आहेत. ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता पातळी चांगली आहे, त्याठिकाणी फटाके बंदीसंदर्भातले सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. सणासुदीच्या काळात सर्वांना आनंद मिळावा, सर्वांचं आरोग्य उत्तम रहावं, अशी भारतीय संस्कृतीची शिकवण असल्याचं राष्ट्रीय हरित लवादानं म्हटलं आहे.