पुणे: कुष्ठरोग निर्मूलनासाठी नागरिकांना कुष्ठरोगाबाबत माहिती, शिक्षण देणे व सुसंवाद साधणे महत्वाचे असून यासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये लोकसहभागावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरोग शोधणे, निदान झालेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार व विकृती प्रतिबंधासाठी डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 अखेर सक्रिय कुष्ठरोग शोध व नियमित सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यादृष्टीने जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाचे सहायक संचालक डॉ. हुकूमचंद पाटोळे तसेच सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी मागील वर्षी झालेल्या कामाची राज्य व जिल्हा पातळीची तुलनात्मक माहिती घेवून डॉ. देशमुख म्हणाले, वेळेत औषधोपचार घेतल्यास कुष्ठरोग हमखास बरा होतो. म्हणून प्राथमिक अवस्थेतच कुष्ठरुग्ण शोधून निदान झालेल्या रुग्णांना वेळेत औषधोपचार मिळवून द्यावेत. यामध्ये रुग्णाच्या सहवासितांची माहिती घेऊन त्यांची तपासणी व नोंदी अचूकपणे घ्याव्यात. याकामी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन झालेल्या कामाची माहिती प्रशासनाला सादर करावी. कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे तसेच याकामी सहभागी आशा व स्वयंसेवकांना तालुकानिहाय सविस्तर प्रशिक्षण द्यावे, असेही डॉ.देशमुख यांनी सांगितले.
या सर्वेक्षणांतर्गत ग्रामीण भागातील 31 लाख 22 हजार 233 तर शहरी भागातील 8 लाख 9 हजार 715 अशा एकूण 39 लाख 32 हजार 52 लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे. याकामी 1 हजार 579 आशा व स्त्री स्वयंसेविका तर 697 आरोग्यसेवक व पुरुष स्वयंसेवक यांच्या मार्फत तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ हुकूमचंद पाटोळे यांनी यावेळी दिली.