मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुचे रुग्ण शोधणं, त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमधे राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. या चाचणीसाठी ४०० प्रयोगशाळा कार्यरत असून दररोज ५० हजार चाचण्या होत आहेत, असं त्यांनी नमुद केले.

गेल्या महिनाभरापासून निर्बंध उठवल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टाळेंबंदी हटवण्याच्या प्रक्रीयेसंदर्भात खूप दक्षता घेत असून निर्बंध काढले जात असले तरी मागणी नंतरही धार्मिक स्थळं, चित्रटगृह, व्यायामशाळा उघडण्यात आल्या नसल्याचं ते म्हणाले.

राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८० टक्के असून मृत्यू दर दोन पूर्णांक चार दशांश आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांचं प्रमाण दोन टक्के आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात आघाडीवर राहुन कार्यरत असलेले आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी प्रशंसेला पात्र असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.