मुंबई : सोशल मीडिया, इंटरनेट आणि नवे तंत्रज्ञान याचा सुरक्षितरित्या वापर कसा करावा याची माहिती तरुण पिढीला व्हावी, यासाठी इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र सायबर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 19 ऑगस्ट 2019 रोजी सायबर सुरक्षा या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील नेहरू सायन्स सेंटर येथे होणाऱ्या या कार्यशाळेत मुंबईतील 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सायबर विश्वातील योग्य माहितीअभावी तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांना बळी पडत आहे. सायबर सुरक्षाविषयक माहिती तरुणांना व्हावी, यासाठी इस्त्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूतावास, नेहरु सायन्स सेंटर आणि महाराष्ट्र सायबर, यांच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
या कार्यक्रमात इस्रायलचे सायबर सुरक्षा विषयातील तज्ज्ञ, महाराष्ट्र सायबर विभागाचे अधिकारी आणि सायबर क्राईम विषयातील तज्ज्ञ हेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात 14 ते 18 वयोगटातील 280 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.