मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात बांबूपासून विविध हस्तकलेच्या वस्तू बनविण्याचे १ हजाराहून अधिक महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. यातील ५०० महिलांनी स्वयंरोजगार सुरु केले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय आणि  बीआरटीसी यांच्यात यासाठी सामंजस्य करार झाला आहे.  यामध्ये बचतगटातील तसेच गरजू महिलांना ६० दिवसांचे बांबू हस्तकला कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बांबूपासून कोळसा तयार करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आणि नीरी यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतला असून हा प्रकल्प प्रगतीपथावर असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा अगरबत्ती प्रकल्पात ६० जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या अगरबत्तीच्या विक्रीसाठी आयटीसी कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. अगरबत्ती उत्पादनानंतर त्याचे पॅकिंग करून या सर्व अगरबत्त्या चेन्नईला पाठविण्यात येतात. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ३०० महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल

टुथपिक निर्मितीद्वारे बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन टुथ पिकची निर्मिती केली जात आहे. आज जिल्ह्यातील १४ महिलांनी यातून स्वंयरोजगार सुरु केला आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सर्व इच्छुक तरूण-तरूणींना बीआरटीसी मार्फत बांबूपासून वस्तू निर्मितीचे ७० दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठेशी सांगड घालण्यात आली आहे. यासाठी गावातच सर्वसाधारण उपयोगिता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

अटल बांबू समृद्धी अभियानांतर्गत ७.५ लाख शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यासाठी बांबू टिश्यू कल्चरची रोपे पुरविण्यात येणार आहेत. योजनेत १० हजार महिला तसेच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने हे काम हाती घेण्यात आले आहे.

चिचपल्ली येथे बांबू सेटम -२ ची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले की, येथे ८० प्रजातीचे बांबू लावण्यात येतील आतापर्यंत ६० प्रजातीच्या बांबूची लागवड येथे झाली आहे. बांबूपासून पार्टिकल बोर्ड तयार करण्याचा प्रकल्प चंद्रपूर येथे कार्यान्वीत होणार आहे. बांबू कारागिरांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. बांबू पार्टीकल बोर्ड हे प्लायवूडला पर्याय म्हणून वापरता येते. पॅनलींग, सिलींग, निवारे, पॅकिंग केसेस, छत, दाराचे पॅनल, फर्निचर, फ्लोरिंग यासारख्या कामात बांबूच्या पार्टिकल बोर्डाचा मोठ्या प्रमाणात वापर करता येतो.

चंद्रपूर, विसापूर, पोंभूर्णा, मूल या ठिकाणी बांबू हॅण्डीक्राफ्ट आणि आर्ट युनिटची स्थापना करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ- राहुरी, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे बांबू कला केंद्रे सुरु झाली आहेत. विद्यापीठ कॅम्पस हे रोजगार निर्मितीची केंद्रे झाली पाहिजेत या अपेक्षेने ही केंद्रे स्थापन करण्यात आल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.